मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pawan Singh : भोजपुरी गायकावर LIVE कार्यक्रमात दगडफेक; घटनास्थळी चेंगराचेंगरी, पोलिसांकडून लाठीचार्ज

Pawan Singh : भोजपुरी गायकावर LIVE कार्यक्रमात दगडफेक; घटनास्थळी चेंगराचेंगरी, पोलिसांकडून लाठीचार्ज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 07, 2023 05:16 PM IST

Pawan Singh Show : एका प्रेक्षकानं गाण्याची शिफारस केली होती, परंतु सिंगरने गाण्यास नकार दिल्यानंतर लाईव्ह कार्यक्रमात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

pawan singh live stage show ballia uttar pradesh
pawan singh live stage show ballia uttar pradesh (HT)

pawan singh live stage show ballia uttar pradesh : प्रेक्षकांनी एक गाणं गाण्याची विनंती गायकानं नाकारल्यानंतर कार्यक्रमातील अज्ञात व्यक्तींनी थेट भोजपुरी अभिनेता आणि गायक पवनसिंहवर तुफान दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशातील बलिया शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. कार्यक्रमात राडा घालणाऱ्या तरुणांनी दगड आणि विटा स्टेजच्या दिशेनं फेकल्या असून त्यामुळं गायक पवनसिंहला जबर मार लागला आहे. त्यानंतर चाहत्यांमध्ये धावपळ उडाल्यानं घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली असून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया शहरात भोजपुरी गायक पवनसिंहचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी वेगळं गाणं गाण्याची विनंती केली. त्याला पवनसिंहने ते गाणं जातीधर्माशी संबंधित असल्याचं सांगत गाण्यास नकार दिल्यानंतर काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आरोपी तरुणांनी पवनसिंहच्या दिशेनं तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात पवनसिंहच्या तोंडाला जबर मार लागला आहे. त्यानंतर उपस्थितांनी पवनसिंहला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

आरोपींनी दगडफेक करत जखमी केल्यानंतर भोजपुरी गायक पवनसिंह बोलताना म्हणाला की, गर्दीत नेमकी कुणी माझ्यावर दगडफेक केली, हे मला समजलेलं नाहीये. आरोपींनी त्यांची ताकद समोरासमोर दाखवायला हवी. गुपचूप हल्ला करू नये. कारण लाखोंच्या संख्येत काहीही कळणार नाही, मला आजपर्यंत कुणीही थांबवू शकलेलं नाही, त्यामुळं आता दगडफेक करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पवनसिंहने म्हटलं आहे.

कोण आहे पवनसिंह?

पवनसिंह हा भोजपुरी अभिनेता आणि गायक असून तो बिहारमधील आरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पवनसिंहने आतापर्यंत ८० हून अधिक भोजपुरी चित्रपटांत काम केलेलं असून २०० हून अधिक संगीत अल्बम शूट केलेली आहेत. २००८ साली त्याचा 'लॉलीपॉप लागेलू' हा अल्बम प्रचंड गाजला होता. परंतु आता त्याच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point