मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ED Raids : ईडीच्या ९५ टक्के धाडी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

ED Raids : ईडीच्या ९५ टक्के धाडी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 10:14 AM IST

ED Raids List : गेल्या काही वर्षांपासून ईडीची कारवाई केवळ विरोधी पक्षाच्याच नेत्यांवर होत असल्याचा नेहमी आरोप केला जातो. त्यानंतर आता समोर आलेल्या एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे.

ED raids in india
ED raids in india (HT)

ED raids in india : सध्याच्या काळात देशातील ईडीच्या कारवायांमुळं मोठं राजकीय वादंग पेटलेलं आहे. ईडी फक्त विरोधकांवरच धाडी टाकत असल्याचा आरोप अनेकदा कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येतो. याशिवाय तपास यंत्रणांचा सेसेमिरा मागे लावून अनेक राज्यांमध्ये सरकारं पाडण्यात आल्याचा आरोप नेहमीच विरोधी पक्ष करत असतात. कारण महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गोव्यात ज्या पद्धतीनं सत्तांतर करण्यात आलं त्यावरून अनेक लोकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. परंतु आता ईडीच्या कारवायांबाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका रिपोर्ट्सनुसार, ईडीनं २०१४ पासून आतापर्यंत ९५ टक्के धाडी या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टाकल्या आहेत. गेल्या १२ वर्षात ईडीनं २०० राजकारण्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल केले होते. त्यातील ८० टक्के आरोपी विरोधी पक्षातील राजकीय नेते होते. याशिवाय या राजकारण्यांचे कुटुंबीय किंवा निकटवर्तीयांवरही या घाडी पडलेल्या आहेत. याशिवाय २०१९ नंतर १२१ राजकीय नेत्यांवर थेट धाडी टाकण्यात आल्या. त्यातील ११५ नेते हे विरोधी पक्षातले होते. त्यामुळं आता समोर आलेल्या या रिपोर्टनंतर राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय ईडी, सीबीआय आणि एनसीबीच्याही कारवायांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

कोणत्या नेत्यांवर झाली कारवाई?

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीवेळी ईडीची नोटिस देण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आणि नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं धाड टाकली होती. त्यानंतर संजय राऊत, अनिल परब, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्यावर तपास यंत्रणांनी कारवाई केली होती. याशिवाय पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, केरळ आणि तेलंगणा या राज्यांमधील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीनं कारवाई केली होती.

IPL_Entry_Point