मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिवसेनेचा नवा डाव; तेजस ठाकरे करणार राजकारणात एन्ट्री?

Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिवसेनेचा नवा डाव; तेजस ठाकरे करणार राजकारणात एन्ट्री?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 08:55 AM IST

Tejas Thackeray : शिवसेनेत बंड झाल्यापासून तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. याशिवाय शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ते राजकारणात येणार असल्याचे संकेत दिलेले आहेत.

Dasara Melava 2022
Dasara Melava 2022 (HT)

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यावरून सध्या शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राजकीय संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली असून शिवसेनेला अजून कुठलंही मैदान मिळालेलं नाही. परंतु आता शिवसेनेकडून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे तेजस ठाकरेंना राजकारणात लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे.

मुंबईत शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी 'चलो शिवतीर्थ'चा नारा दिला आहे. त्यासाठी शहरातील अनेक भागांमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यात तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आल्यानं आता ते लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. शिवसेनेनं लावलेल्या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळं आता तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री करण्यासाठी शिवसेनेनं दसरा मेळाव्याचा मुहुर्त काढला की काय?, अशा चर्चा सुरू आहेत.

<p>uddhav thackeray latest news</p>
uddhav thackeray latest news (HT)

याआधीही झाली होती चर्चा...

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड करत पक्षातील ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून तेजस ठाकरे हे राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यामुळं दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेकडून तेजस ठाकरेंना राजकारणात लॉन्च केलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

IPL_Entry_Point