मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Khurja Conversions : भाजप आमदाराच्या उपस्थितीत शेकडोंचं धर्मांतर; धक्कादायक प्रकारानं देशात खळबळ

Khurja Conversions : भाजप आमदाराच्या उपस्थितीत शेकडोंचं धर्मांतर; धक्कादायक प्रकारानं देशात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 26, 2022 08:19 AM IST

Khurja Conversions : ज्या लोकांनी आधी परिस्थितीमुळं किंवा जबरदस्तीमुळं याआधी दुसऱ्या धर्मात प्रवेश केला होता, त्यांना परत हिंदू धर्मात आणण्यात आल्याचा दावा भाजप आमदारानं केला आहे.

Khurja Uttar Pradesh Conversions
Khurja Uttar Pradesh Conversions (HT)

Khurja Uttar Pradesh Conversions : ख्रिसमस नाताळला धर्मांतरणाचा आरोप करत एका कार्यक्रमात हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशात भाजप आमदाराच्या उपस्थितीत शंभराहून अधिक लोकांचं धर्मांतर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या धर्मातील अनेक लोकांनी धर्मांतर करत हिंदू धर्म स्वीकारला आहे. विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोकांचं धर्मांतर करण्यात आल्यानं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील खुर्जामध्ये भाजप आमदार मिनाक्षी सिंह यांच्या उपस्थितीत आणि विहिंपच्या कार्यक्रमात विविध धर्माच्या लोकांना सनातन धर्मात प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी धार्मिक विधी पार पाडत आणि मंत्रोच्चार करत तब्बल १२५ लोकांचं धर्मांतरण करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना भाजप आमदार मिनाक्षी सिंह म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील २० कुटुंबातल्या १२५ जणांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानं मला त्याचा आनंद होत आहे. यापूर्वी या लोकांनी जबरदस्तीनं किंवा आर्थिक स्थितीमुळं दुसऱ्या धर्मात प्रवेश केला होता. आता त्यांची आम्ही हिंदू धर्मात घरवापसी केल्याचं आमदार सिंह यांनी सांगितलं.

यावेळी आमदार मिनाक्षी सिंह यांनी धर्मांतर केलेल्या लोकांना भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा करण्याची शपथ दिली. याशिवाय कायदेशीर प्रक्रियाही वकिलांच्या मार्फत पूर्ण करण्यात आली असून कुटुंबियांच्या परवानगीनंच हे धर्मांतर करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे हेमंत सिंह बोलताना म्हणाले की, हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात प्रवेश केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. यापूर्वी त्यांना लालूच देऊन दुसऱ्या धर्मात प्रवेश देण्यात आला होता. परंतु आता आम्ही त्यांची घरवापसी केल्याचं हेमंत सिंह म्हणाले.

IPL_Entry_Point