मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Katgaon Gram Sabha: ग्रामसभा घेतली नाही म्हणून गावकऱ्यांनी सरपंचाला डांबलं; लातूरमधील धक्कादायक घटना

Katgaon Gram Sabha: ग्रामसभा घेतली नाही म्हणून गावकऱ्यांनी सरपंचाला डांबलं; लातूरमधील धक्कादायक घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 06, 2022 03:08 PM IST

Latur Crime News : शासनाच्या नियमांनुसार, वर्षातून दोनदा ग्रामपंचातीनं गावात ग्रामसभा घेणं बंधनकारक असतं.

Katgaon Latur District Gram Sabha
Katgaon Latur District Gram Sabha (HT)

Katgaon Latur District Gram Sabha : ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा न घेतल्यामुळं संतापलेल्या गावकऱ्यांनी थेट सरपंचालाच डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासनाच्या नियमांनुसार वर्षातून दोनदा ग्रामसभा होणं बंधनकारक असताना देखील सरपंचानं ग्रामसभा घेण्यास नकार दिल्यानं संतप्त गावकऱ्यांनी सरपंचाला कोंडून ठेवल्याची घटना लातूर जिल्ह्यातील काटगांवमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील काटगांवचे सरपंच दत्ता गायकवाड यांनी गेल्या अडीच वर्षांपासून गावात ग्रामसभा घेतलेली नाही. त्यामुळं त्यांनी सरकारी नियमांचं आणि कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात तासभर डांबून ठेवलं. त्यानंतर त्यांनी गुरुवारी ग्रामसभा घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांचा राग शांत झाला. त्यानंतर सरपंचाला ग्रामपंचायतीतून सोडण्यात आलं असल्याची माहिती आहे.

या प्रकरणाची आता प्रशासकीय पातळीवरही दखल घेण्यात आली आहे. ग्रामसेवक आणि सरपंच गायकवाड यांच्या मागील काळातील कारभाराची चौकशी करून त्यांनी ग्रामसभा घेतली नसल्याचं सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती स्थानिक गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीला वर्षातून दोनदा गावात ग्रामसभा घेणं अनिवार्य असतं. परंतु दोन्ही वार्षिक ग्रामसभांमध्ये सहा महिन्यांचं अंतर असायला हवं. अनेकदा काही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय सणांना म्हणजेच १५ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला ग्रामसभा घेण्यात येत असते. ग्रामसभांमध्ये गावातील विकामकामांपेक्षा राजकीय वादच जास्त होत असल्याचे अनेक प्रकार याआधी राज्यात उघडकीस आलेले आहेत. याशिवाय काही ग्रामपंचायतींमध्ये तर ग्रामसभेत झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग