मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2023 07:12 AM IST

Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची हा वाद सध्या सुरू असतांना शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुदत आज संपणार आहे. दरम्यान, पुढे शिवसेना कुणाची या बाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठे खिंडार पडले. यामुळे शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. दरम्यान, दोन्ही गट शिवसेनेवर दावेदारी करत असून हा वाद कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. त्यात शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची आज मुदत संपत असून पुढे निवडणूक आयोग काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली. ही मुदत आज सोमवारी संपत आहे. महाविकास आघाडीत नाराजी असल्यामुळे एकनाथ शिंदें यांनी बंड करत शिवसेनेला खिंडार पाडले. आता शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुरू आहे. हा निर्णयावर आयोग ३० जानेवारीला निकाल देणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपत असल्याने शिवसेना ठाकरे गट पुढील रणनीती काय ठरवणार या कडे देखील महत्वाचे ठरणार आहे. याबाबत खासदार अनिल देसाई म्हणाले, की ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ द्यावी आणि पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्याव्यात, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. त्यावर त्यांनी निर्णय दिलेला नाही. सोमवारी मुदत संपत असल्याची बाब तांत्रिक आहे. आयोगाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. आयोगाचा निर्णय काहीही झाला, तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी झालेली निवड ही बेकायदा असल्याचा शिंदे गटाने दावा केला आहे. मात्र याच पद्धतीने शिंदे यांचीही प्रमुख नेतेपदी निवड झाली आहे. हे पद पक्षाच्या घटनेत अस्तित्वातच नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने मांडला आहे.

दरम्यान, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आज ठाकरे गट षण्मुखानंद सभागृहात मेळावा घेणार आहे. या वेळी भाजप आणि शिंदे गटाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील असे सूत्रांनी सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग