मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संगमांविरुद्ध घाणेरडा प्रचार केला अन् सत्तेसाठी लाचारी पत्करली; उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल

संगमांविरुद्ध घाणेरडा प्रचार केला अन् सत्तेसाठी लाचारी पत्करली; उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 02:16 PM IST

Uddhav Thackeray Speech : दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये घेतलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडण्यात आलंय का?, ते शुद्ध झालेत का?, असे सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray On Amit Shah (HT)

Uddhav Thackeray On Amit Shah : सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तळवे चाटल्याची टीका गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांसह भाजपवर जोरदार आगपाखड केली आहे. खेडमधील शिवगर्जना मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी 'मेघालयात तुम्ही संगमांचं काय चाटलं?', असा सवाल शहांना केला होता. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अमित शहा यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे. कोनरॉड संगमा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपा सत्तेसाठी लाचारी पत्करत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा घणाघात ठाकरेंनी अमित शहांवर केला आहे. त्यामुळं आता यावरून भाजपा आणि ठाकरे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मेघालयात कोनरॉड संगमा यांच्याविरोधात अमित शहांनी अत्यंत घाणेरडा अपप्रचार केला होता. मेघालय हे देशातील सर्वात जास्त भ्रष्ट राज्य असून त्यामुळं केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाही, संगमांनी गरिबांचा पैसा लुटला, असे आरोप शहा यांनी केले होते, त्यानंतर अत्यंत लाचार आणि केविलवाण्या पद्धतीनं भाजपनं संगमा यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. ही स्थिती का निर्माण झाली?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर सडकून टीका केली आहे.

कुटुंबाची कुटुंब बदनाम करायची, उध्वस्त करायची आणि तरीही काही झालं नाही तर लाळघोटेपणानं त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं, हेच भाजपाने मेघालयात केलं आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या लोकांना आरोप करून किंवा चौकशीचा ससेमिरा लावून पक्षात घेतलं, त्यांच्यावर गोमूत्र शिंपडलंय का?, ते शुद्ध झाले आहेत का?, हा निव्वळ सत्तापिपासूपणा असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.

IPL_Entry_Point