मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje: कोण तो राज्यपाल? मला त्याचं नावही घ्यायचं नाही; उदयनराजे कडाडले

Udayanraje: कोण तो राज्यपाल? मला त्याचं नावही घ्यायचं नाही; उदयनराजे कडाडले

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 04, 2022 10:38 AM IST

Udayanraje Bhosale Slams Koshyari: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उदयनराजे भोसले यांनी आज जोरदार हल्लाबोल केला.

Udayanraje Bhosale - Bhagat Singh Koshyari
Udayanraje Bhosale - Bhagat Singh Koshyari

Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार होत असलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी आज किल्ले रायगडावर आक्रोश आंदोलन केलं. उदयनराजे यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. मला त्याचं नावही घ्यायचं नाही, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, असं म्हटलं होतं. याआधीही त्यांनी असंच खोडसाळ वक्तव्य केलं होतं. ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं’, असं ते म्हणाले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचाही अपमान केला होता. रायगडावरील भाषणात उदयनराजे यांनी या सगळ्याची आठवण देत राज्यपाल कोश्यारींवर घणाघात केला. 'राज्यपाल हे सन्मानाचं पद असतं, पण चूक ही चूकच असते. कसल्या प्रोटोकॉलच्या गोष्टी सांगता? ह्या लोकांना शिवाजी महाराजांचा अपमान करणं अंगवळणी पडलंय. ह्यांनी आपल्याला गृहित धरलंय, त्यांना वाटतं काहीही होणार नाही. एक बोलला की दुसरा बोलतो. कोण तो राज्यपाल? मला त्याचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही. तो मोठा नव्हताच कधी. जे चुकीचं बोलतात, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी, असं उदयनराजे म्हणाले.

केवढं मोठं प्लानिंग? शिवरायांचं नाव पुसायला निघालेत!

'राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर सोयीनुसार केला आहे. सोयीप्रमाणे इतिहास सांगितला जातो. चित्रपट, लेखक अशा सर्वच ठिकाणी इतिहासाची मोडतोड केली जात आहे. आता तर थेट अवमानही केला जातोय. हे लोक किती प्लानिंगनं चालले आहेत. मोठं प्लानिंग आहे. शिवाजी महाराजांचं नावही पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यपाल इथं असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं, असंही उदयनराजे नंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

IPL_Entry_Point