मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Two Farmers Taken Extreme Step In Sillod Sambhajinagar Due To Lack Of Price For Agricultural Produce

कृषिमंत्र्यांच्या सिल्लोडमध्ये दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास; धक्कादायक घटनेमुळं राज्यात शोककळा

farmers issues in sillod sambhajinagar
farmers issues in sillod sambhajinagar (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Mar 06, 2023 03:11 PM IST

farmers issues in maharashtra : शेतमालाचे दर कोसळल्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता कृषिमंत्र्यांच्या सिल्लोडमध्ये दोन शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

farmers issues in sillod sambhajinagar : गेल्या काही दिवसांपासून कापूस, कांदा आणि पालेभाज्यांचे दर कोसळल्यामुळं बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच आता मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं राज्यात शोककळा पसरली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव आणि जनार्दन सुपडू तायडे असं आयुष्य संपवलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या अंधारी गावातील भागिनाथ आणि जनार्दन या शेतकऱ्यांच्या शेतात मोठा खर्च करूनही कमी उत्पन्न निघालं होतं. त्यातच शेतमालाचे भाव कोसळल्यानं आता पुढे काय करायचं?, या चिंतेतून दोन्ही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं संभाजीनगरसह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. भागिनाथ पांडव यांच्याकडील तीन एकर शेतीत त्यांनी टरबुजाची लागवड केली होती. परंतु अपेक्षित उत्पन्न न झाल्यामुळं आणि मालाचे भाव कोसळल्यामुळं तणावात त्यांनी आयुष्य संपवलं आहे. तर याच कारणामुळं जनार्दन तायडे यांनीदेखील गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. त्यानंतर आता या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतु आता कृषिमंत्री सत्तार यांच्याच मतदारसंघात दोन शेतकऱ्यांनी नापिकीमुळं आयुष्य संपवल्यामुळं सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

WhatsApp channel