मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मुंबई अन् ठाण्यातून माणसं आणली गेली; रामदास कदमांचा आरोप

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मुंबई अन् ठाण्यातून माणसं आणली गेली; रामदास कदमांचा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 02:11 PM IST

Ramdas Kadam Live News : उद्धव ठाकरेंच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे असून त्याचा मी साक्षीदार असल्याचं सांगत रामदास कदमांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam On Uddhav Thackeray (HT)

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवगर्जना सभेतून शिंदे गटाविरोधात रणशिंग फुकलेलं आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचा पराभव करण्याचा निर्धार ठाकरे गटाच्या नेत्यांनी खेडमधील सभेत केला आहे. याशिवाय रामदास कदम यांचे कट्टर राजकीय वैरी संजय कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता रामदास कदमांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं आता शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले असून त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यामुळं उद्धव ठाकरे एक वेळा नाही तर शंभर वेळा जरी खेडमध्ये आला तरी योगेश कदमला पाडू शकणार नाहीत, असं म्हणत रामदास कदम यांनी ठाकरे गटाला खुलं आव्हान दिलं आहे. याशिवाय ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईसह ठाण्यातून माणसं आणण्यात आली होती, असाही आरोप कदमांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंची विराट सभा झालेली असेल तर त्यात खेडमधील किती लोक होते?, ठाकरेंचं भाषण सुरू असताना अनेक लोक तिथून निघूनही जात होते. ठाकरे गट चोर, गद्दार आणि खोटे अशा शब्दांमध्येच अडकलेला आहे. काविळ झालेला असल्यामुळं ठाकरे गटाच्या नेत्यांना दुनिया पिवळी दिसत आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर तुम्हाला मुख्यमंत्री होता आलं असतं का?, असा सवाल करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचारी असून त्यांनी अशोक पाटील यांचं तिकीट कापण्यासाठी किती पैसे घेतले?, मुख्यमंत्री होण्यासाठी कुणासोबत गद्दारी केली?, याची उत्तर द्यायला हवीत, असंही रामदास कदमांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांनी माझ्या मुलाला (योगेश कदम) पाडण्याचा प्रयत्न केला होता. मला तर अनेक नेते संपवायलाच निघाले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तर मला पाडण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.

IPL_Entry_Point