मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Murder: घरकाम जमत नसल्याने सासूने केला सुनेचा खून; पुण्यातील लोहगाव येथील खळबळजनक घटना

Pune Murder: घरकाम जमत नसल्याने सासूने केला सुनेचा खून; पुण्यातील लोहगाव येथील खळबळजनक घटना

Mar 08, 2023 02:10 PM IST

Pune Crime News : पुण्यातील लोहगाव येथे सुनेला घरकाम जमत नसल्याने सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Crime
Pune Crime (HT_PRINT)

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनेला घरकाम जमत नसल्याने सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केला. ही घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली असून विमानतळ पोलिसांनी आरोपी सासुला अटक केली आहे.

रितू रवींद्र माळवी (वय २८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. तर कमला प्रभुलाल माळवी (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितू माळवीला घरकाम जमत नाही तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करत सासू कमला तिचा छळ करत होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रीज उघडताना रितूला पाय लागल्याने दोघींमध्ये वाद झाले होते. या गोष्टीवरून रितूने सासू कमलाशी वाद घातला. हा वाद टोकाला गेल्याने सासू कमलाने सून रितूला मारहाण केली. या मारहाणीत तिचे डोके तिने फरशीवर आपटले.

या मारहाणीत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात रितूच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण‌ झाल्याचे उघड झाले. दरम्यान, विमानतळ पोलिसांनी सासू कमलाची चौकशी केली असता, तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करत आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर