मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुणे हादरले ! कुटुंबातील तिघांचा विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू, आई गंभीर

Pune Crime : पुणे हादरले ! कुटुंबातील तिघांचा विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू, आई गंभीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 23, 2023 06:29 AM IST

Pune Crime : पुण्यात आर्थिक विवंचनेतून आणि नैराश्य आणि आजारपणाला कंटाळून एका कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.

Crime
Crime

पुणे : पुण्यात आर्थिक विवंचनेतून आणि नैराश्य आणि आजारपणाला कंटाळून एका कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री फुरसुंगीमधील लक्ष्मी निवास येथे घडली. यात वृद्ध वडिलांचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (वय ६०) आणि मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, फुरसुंगी येथील लक्ष्मी निवास येथे अबनावे रहातात. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना फोन केला. मात्र, ते फोन उचलत नसल्याने काही वेगळी बाब नाही ना हे पाहण्यासाठी त्यांचे नातेवाईक घरी आले. त्यांना त्यांचे घर बंद दिसले. शेजारच्यांनी देखील दार वाजवले, पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर तिघेही घरात पडलेले आढळून आले. सूर्यप्रकाश अबनावे व जनाबाई हे अत्यवस्थ होते. तर चेतन हा थोडा शुद्धित होता. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सूर्यप्रकाश यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. जनाबाई आणि चेतन यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अबनावे कुटुंब गेल्या १० ते १२ वर्षांपासून येथे रहात आहेत. सूर्यप्रकाश हे एका फोटोग्राफरकडे कामाला होते. ते निवृत्त झाले असून त्यांना उत्पन्नाचे काही साधन नाही. त्यांच्या पत्नीला कन्सर झाला असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. मुलगा चेतन याची नोकरी गेली असून त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. हे संपूर्ण कुटुंब आर्थिक व आजारपणामुळे नैराशयात होते. यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point

विभाग