मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Exam: पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचे तीनतेरा; विद्यार्थ्यांकडून दणक्यात कॉप्या, चौकशीचे आदेश

HSC Exam: पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचे तीनतेरा; विद्यार्थ्यांकडून दणक्यात कॉप्या, चौकशीचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 21, 2023 05:48 PM IST

HSC Board Exam 2023 : बारावीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेक केंद्रांवर दणक्यात कॉप्या करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

HSC Board Exam 2023
HSC Board Exam 2023 (HT)

HSC Board Exam 2023 In Bhandara : महाराष्ट्र शासन आणि शिक्षण खात्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परिक्षेवेळी कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत असतात. परंतु तरीदेखील हे प्रकार रोखण्यात शासनाला अपयश येत आहे. बारावी बोर्डाच्या परिक्षेचा आजच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक परिक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांनी दणक्यात कॉप्या करत पेपर सोडवल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील भंडारा जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये परिक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्यात आल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता शिक्षण खात्यानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश काढले आहे.

भंडारा जिल्ह्याच्या बेला येथील महिंद्रा शाळेतील परिक्षा केंद्रावर आरोपींकडून विद्यार्थ्यांना सर्रासपणे कॉपी पुरवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अनेक पालक आणि शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळं प्रामाणिकपणे अभ्यास करून परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मात्र मोठं नुकसान होत असल्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता अनेकदा कॉपीमुक्त अभियानाच्या बाता मारणाऱ्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभाराचं दर्शन झाल्यामुळं अनेकांनी शिक्षण खात्यावर टीकेची झोड उठवली आहे.

भंडाऱ्यातील बेला येथील परिक्षा केंद्रावर कॉपी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता प्रशासनानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील ज्या-ज्या परिक्षा केंद्रांवर कॉपी करण्यात आल्याचे प्रकार समोर आल्यानंतर शाळांची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय पुढील सर्व पेपर्सच्या दरम्यान कॉप्यांचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचं भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point