मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIRAL VIDEO : ‘बाळासाहेब घात झाला हो, आता लढायचं कसं?’ परभणीतील शिवसैनिकाच्या भावनेचा बांध फुटला
shivsainik vijay khaste patil parbhani viral video
shivsainik vijay khaste patil parbhani viral video (HT)

VIRAL VIDEO : ‘बाळासाहेब घात झाला हो, आता लढायचं कसं?’ परभणीतील शिवसैनिकाच्या भावनेचा बांध फुटला

19 February 2023, 18:35 ISTAtik Sikandar Shaikh

vijay khaste patil viral video : शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर परभणीतील शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले आहेत.

shivsainik vijay khaste patil parbhani viral video : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. शिवसेनेतील फूटीमुळं राज्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. त्यातच आता कोर्टानं ठाकरेंचा पक्ष शिंदेंकडे सोपवल्यानंतर परभणीतील एका शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले आहेत. बाळासाहेब घात झाला हो, असं म्हणत शिवसैनिक ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परभणी जिल्ह्यातील विजय खिस्ते पाटील नावाच्या शिवसैनिकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर नाराज झालेल्या विजय खिस्ते यांच्या भावनांचा बांध फुटला, बाळासाहेब घात झाला हो, परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला जो धनुष्यबाण दिला होता तोच धनुष्यबाण गद्दारांनी गद्दारी करून काढून घेतला आहे. गद्दारांनी शिवसैनिकांच्या काळजात घाव घातला आहे, तुम्ही म्हणतात, रडायचं नाही, लढायचं पण आता कसं लढायचं?, असा सवालही विजय खिस्ते यांनी व्हिडिओतून विचारला आहे. विजय खिस्ते पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून परभणीत शिवसेनेचं काम करतात, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी आपल्या रक्तानं पत्र लिहिलं होतं.

उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान...

निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीबाहेर येत शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच आमचा धनुष्यबाण चोरीला गेला आहे. शिवसेनेला चोरणाऱ्या चोरट्यांना आम्ही पकडलं असून त्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याशिवाय तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटाला निवडणुकीत आमने-सामने येण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळं आता यावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष पेटलेला आहे.