फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ विजयी मार्गावर परतला आहे. यंदाच्या सीझनमधील सलग ६ पराभवानंतर आरसीबीने पहिला विजय नोंदवला आहे. गुरुवारी (२५ एप्रिल) झालेल्या सामन्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा (SRH) ३५ धावांनी पराभव केला.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला, यामध्ये आरसीबीने २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ घरच्या मैदानावर ८ विकेट गमावून केवळ १७१ धावा करू शकला आणि सामना गमावला.
सनरायझर्ससाठी एकही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. शाहबाज अहमदने सर्वाधिक ४० धावांची नाबाद खेळी खेळली. तर अभिषेक शर्मा आणि कर्णधार पॅट कमिन्सने ३१-३१ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला २० चा आकडा गाठता आला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात ३ फिरकी गोलंदाजी पर्यायांसह उतरली होती. विल जॅकने ट्रॅव्हिस हेडला बाद केल्याने ही रणनीती पहिल्याच षटकापासून प्रभावी ठरली. दरम्यान, कर्ण शर्माने ४ षटकात केवळ २९ धावा देत २ बळी घेतले. तिसरा फिरकीपटू स्वप्नील सिंगने ३ षटकात ४० धावा दिल्या, परंतु त्याने एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांच्या विकेट्स घेत आरसीबीसाठी सामना एकतर्फी केला. या सामन्यात यश दयालने १ आणि कॅमेरून ग्रीनने २ विकेट घेतल्या.
आरसीबीकडून या सामन्यात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकी खेळी केली. रजत पाटीदारने अवघ्या २० चेंडूत ५० धावा केल्या. तर किंग कोहलीने ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. शेवटी कॅमेरून ग्रीन २० चेंडूत ३७ धावा करून नाबाद परतला. तर हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ बळी घेतले.