मुंबई: राजगडावर यंदा शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाठात साजरा केला जाणार आहे. या साठी राज्य शासनाने जय्यत तयारी केली आहे. आज रायगडावर शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली असून या नंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे. दरम्यान, उद्या या सोहळ्यासाठी १५० बस गाड्या, ३५० आरोग्य पथके आणि तब्बल २ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उद्या तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उद्या राजगडावर दाखल होणार आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत १५० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहनतळ उभारण्यात आला आहे. तब्बल साडेतीन हजार वाहने या ठिकाणी उभी करता येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १० हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी ४० हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.
उष्माघात होऊ नये तसेच येणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ३५० वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहे. यात गडावर, पायऱ्यांवर आणि वाहनतळावर ही वैद्यकीय सुविधा दिली जाणार आहे. गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी जवळपास २ हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.