मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं काढली तर त्यांना ५० वर्षे जेलमध्ये राहावं लागेल'

'नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं काढली तर त्यांना ५० वर्षे जेलमध्ये राहावं लागेल'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 06, 2023 12:59 PM IST

Sanjay Raut warns Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.

Narayan Rane
Narayan Rane (PTI)

Sanjay Raut warns Narayan Rane : संजय राऊत हे जेलमध्ये जाण्याचा रस्ता पुन्हा बनवत आहेत. त्यांना सोडणार नाही, अशी धमकी देणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्षे तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांनी मला बोलायला लावू नये. माझ्या नादाला लागलात तर महागात पडेल,’ असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना ‘सामना’तील अग्रलेखांवरून नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. ‘सामनाच्या अग्रलेखांची सगळी कात्रणं माझ्याकडं आहेत. मी वकिलांकडं पाठवून ठेवली आहेत. संजय राऊत यांच्यावर केस टाकणार आहे,’ असं राणे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेचा राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

'आम्ही नारायण राणेंसारखे पळपुटे आणि डरपोक नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. कोण कोणाला हिंमतीच्या गोष्टी सांगतोय. त्यांनी वल्गना कराव्यात. मी अद्याप त्यांच्यावर काहीच बोललेलो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. पण त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देणार असाल तर राजवस्त्र काढून बाजूला काढा आणि या. मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची, असा गर्भित इशाराच राऊत यांनी दिला.

‘हे काय मला जेलमध्ये टाकणार? मी माझ्या हिंमतीवर जेलमध्ये गेलो होतो. माझ्या पक्षासाठी गेलो होतो. तुमच्यासारखा पळून गेलो नाही. शरणागती पत्करली नाही. नामर्द नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. घाला मला जेलमध्ये. कायदा आणि न्यायालय तुमच्या हातात आहे असं वाटतं का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का?, असा रोकडा सवाल त्यांनी राणेंना केला. 'जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देणाऱ्यांची माझ्याकडं सगळी नोंद आहे. मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला प्रत्येकाची वक्तव्यं पाठवतोय. नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं काढलीत तर त्यांना ५० वर्षे जेलमध्ये राहावं लागेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

IPL_Entry_Point