मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shahajibapu Patil : 'मविआ हा नाच्यांचा खेळ, त्यात विनायक राऊत...', शहाजीबापू पाटलांची खोचक टीका

Shahajibapu Patil : 'मविआ हा नाच्यांचा खेळ, त्यात विनायक राऊत...', शहाजीबापू पाटलांची खोचक टीका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 22, 2022 01:32 PM IST

Shahajibapu Patil Vs Vinayak Raut: शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ असल्याची टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी केली होती, आता त्याला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

Shahajibapu Patil vs Vinayak Raut
Shahajibapu Patil vs Vinayak Raut (HT)

Shahajibapu Patil vs Vinayak Raut : शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी काल सोलापूरातील सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता, त्यात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ असून स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील हे त्यातले ‘सोंगाड्या’ आहेत, अशी टीका केली होती, आता त्याला शिंगे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शहाजीबापू पाटील यांनी विनायक राऊतांसह महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं आहे की, मविआ हा नाच्याचा खेळ असून त्यात विनायक राऊत नाचत होते का?, विनायक राऊतांनी सांगोल्यात उरल्या-सुरल्या तुटपुंज्या शिवसैनिकांची सभा घेतली, ज्या सांगोल्यात लाखोंच्या संख्येनं मेळावे व्हायचे तिथं राऊतांना ५०-६० टुकार पोरांना एकत्र करत मेळावा घेण्याची वेळ आल्याची खरमरीत टीका शहाजीबापू पाटलांनी विनायक राऊतांवर केली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा नाच्याचा खेळ सुरू होता, आणि त्यात विनायक राऊत नाचत होते का?, मी येत्या काळात विनायक राऊतांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचं शहाजीबापू पाटलांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. याशिवाय मी एखादं विधान केलं तर राऊतांना वाईट वाटायला नको, मी सगळं बोलणं योग्य नाही आता कोकणातही माझी भाषणं ऐकण्यासाठी विनायक राऊतांनी त्यांच्या कानातला मळ काढून ठेवायला हवा, असं म्हणत शहाजीबापू पाटलांनी विनायक राऊतांवर टिकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसह पक्षातील अन्य नेत्यांनी राज्यात शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही गणेशोत्सवानंतर राज्यात दौरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं आता येत्या काळात शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point