मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Paper Leak : बारावीचा पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही; पेपरफुटीबाबत सरकारचा मोठा निर्णय

HSC Paper Leak : बारावीचा पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही; पेपरफुटीबाबत सरकारचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 07:59 PM IST

HSC Paper Leak : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बारावीचे पेपर फुटल्याची घटना समोर आल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

HSC Paper Leak Cases In Maharashtra
HSC Paper Leak Cases In Maharashtra (HT)

HSC Paper Leak Cases In Maharashtra : भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकरणांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता बारावीचे पेपर फोडणाऱ्या आरोपींचे आणि त्यात सामील असलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी दोन शिक्षकांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना येत्या १० मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केल्यामुळं पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा बसण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांपूर्वी झालेला बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच लीक झाला होता. अत्यंत कडेकोट सुरक्षेत पेपर केंद्रांपर्यंत पोहचवले जात असतानाही पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांसह अनेकांनी शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या पेपरफुटीच्या प्रकरणात सुरुवातीला दोन आणि त्यानंतर पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यापैकी दोन आरोपी खुद्द संस्थाचालक शिक्षक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

पेपरफुटीची प्रकरणं समोर आल्यानंतर शिक्षण खात्यानं सिंदखेडराजा तालुक्यातील रनरसह अनेक कर्मचाऱ्यांची तातडीनं बदली केली होती. त्यानंतर आता या प्रकरणांना गंभीरतेनं घेत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं त्यातील आरोपींच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता बारावीचे पेपर फोडणाऱ्यांची सरकारकडून गय केली जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point