मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : प्रकाश सुर्वे कुठे आहेत?; शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut : प्रकाश सुर्वे कुठे आहेत?; शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी संजय राऊत यांचा सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 14, 2023 12:02 PM IST

Sanjay Raut on Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे.

Sheetal Mhatre - Sanjay Raut
Sheetal Mhatre - Sanjay Raut

Sanjay Raut on Sheetal Mhatre Viral Video : शिंदे गटात गेलेल्या मुंबईतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या एका आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओवरून सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला गेल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला असून या प्रकरणी शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. व्हायरल झालेला व्हिडिओ हा शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा होता. शीतल म्हात्रे यांनी यावर आपलं म्हणणं मांडलं आहे. मात्र, प्रकाश सुर्वे यांनी मौन बाळगलं आहे. संजय राऊत यांनी नेमका हाच मुद्दा पकडला आहे. ‘या प्रकरणातील पुरुष आमदाराची काही तक्रार आहे का? ते कुठं आहेत? ते का बोलत नाहीत? बदनामी त्यांचीही झालीय. पुरुषाची बदनामी होत नाही का?,’ असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

'शीतल म्हात्रे प्रकरणी होत असलेल्या अटका हा कायद्याचा गैरवापर आहे. दिल्लीत असल्यानं मला त्या व्हिडिओबद्दल मला फार माहिती नाही. जो काही व्हिडिओ आहे, तो खरा की खोटा याचा शोध आधी पोलिसांनी घ्यायला हवा. तो सापडल्यानंतर मग मॉर्फिंग वगैरे झालंय का त्याचा तपास करायला हवा, असं राऊत म्हणाले.

'मिंधे गटाच्या ज्या कोणी महिला आहेत, त्यांनी आपली बदनामी झाल्याचा आरोप केला आहे. त्या संदर्भात कायद्यानं खटले दाखल होऊ शकतात. हा व्हिडिओ लाखो-कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचला आहे, मग त्या सगळ्यांना अटक करणार का?, असा प्रश्नही राऊत यांनी केला.

‘महाराष्ट्रात अशा खूप गोष्टी घडल्या आहेत आणि घडत आहेत. महिलांचं शोषण होऊ नये अशी आमचीही भूमिका आहे. सरकार कोणतंही असो, महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. त्यांच्या बाबतीत सभ्य भाषा वापरली गेली पाहिजे. महाराष्ट्रात आपण जिजाऊ, अहिल्याबाई यांची नावं घेतो, त्यामुळं आपणही मर्यादा पाळली पाहिजे, असं राऊत म्हणाले. 'काही गोष्टी केवळ राजकारणासाठी, सूडापोटी केल्या जात असतील, तर त्याला राजकीय पद्धतीनं उत्तर दिलं जाणार, असंही राऊत म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग