मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Subhash Desai : भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपमधून विरोध; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Subhash Desai : भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपमधून विरोध; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2023 10:43 AM IST

Subhash Desai son Bhushan Desai : ठाकरे गटाचे ज्येष्ठ सदस्य असलेले सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठा धक्का बसला आहे. मात्र, भूषण शिंदे यांच्या प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

Subhash Desai son Bhushan Desai :
Subhash Desai son Bhushan Desai :

मुंबई : ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून मातोश्रीच्या अत्यंत जवळचे असलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांची साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. यावर सुभाष देसाई यांनी भूषण देसाईच्या कुठल्याही पक्षात जाण्याने ठाकरे गटावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हा राजकीय गदारोळ सुरू असतांना मात्र, भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिण्यात आले आहे. ज्याला सामाजिक जाणीव तसेच कडीचीही किंमत नसतांना त्यांना प्रवेश देऊ नसे असे एका भाजप नेत्याने म्हटले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाचे गोरेगावमधील विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्र लिहिलं आहे. एका भ्रष्ट नेत्यांच्या मुलांना पक्षात प्रवेश देऊ नका, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी भूमिका स्पष्ट केली असून अनेक गंभीर आरोप त्यांनी भूषण देसाई यांच्यावर केले आहे. जाधव म्हणाले, सामाजिक क्षेत्रात कवडीचीही किंमत नसलेले चिरंजीव भूषण सुभाष देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे अतिशय वेदनादायक आहे. कारण ज्या माणसानं कधीही सामाजिक बांधिलकी जपली नाही, सामाजिक क्षेत्रात एक इंचाचंही काम नाही, फक्त भ्रष्टाचाराने हात बरबटलेले व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे, अशा व्यक्तीला शिवसेना शिंदे गटानं प्रवेश दिला. यावर गोरेगावकरांच्या तीव्र भावना आहेत. आमचा याला विरोध असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आदित्य ठाकरे म्हणाले, भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ते कधीही शिवसेनेत सक्रीय नव्हते. ज्यांना कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचं आहे त्यांनी जरूर जावं. सुभाष देसाई हे आमच्यासोबत आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावली सारखे असतात. ते आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. भूषण देसाई यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही त्यांना जिथे कुठे जायचं आहे त्यांनी जावं.

तर सुभाष देसाई म्हणाले, माझा मुलगा भूषण देसाईने शिंदे गटात प्रवेश केला, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील.

IPL_Entry_Point

विभाग