मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: महाराष्ट्र कुस्ती संघटना बरखास्त, शरद पवार म्हणाले, मी आधीच…

Sharad Pawar: महाराष्ट्र कुस्ती संघटना बरखास्त, शरद पवार म्हणाले, मी आधीच…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 02, 2022 04:07 PM IST

Sharad Pawar on Maharashtra Rajya kustigir parishad: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याच्या केंद्रीय पातळीवरील निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Maharashtra Rajya kustigir parishad dissolve: शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवरून घेण्यात आला आहे. हा शरद पवारांसाठी धक्का असल्याची चर्चा सुरू होती. पवारांनी मात्र ही सगळी चर्चा खोडून काढली आहे. ‘कुस्तीगीर परिषद बरखास्त होण्याचा राजकारणाशी अजिबात संबंध नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेवर झालेली कारवाई ही परिषदेच्या कारभाराशी संबंधित आहे. अलीकडं परिषदेच्या कामाच्या संदर्भात सातत्यानं तक्रारी येत होत्या. पुणे जिल्ह्यातून आलेल्या तक्रारींचं स्वरूप गंभीर होतं. त्या परिषदेचं काम पाहणारे बाळासाहेब लांडगे व अन्य पदाधिकाऱ्यांना मी याबाबत कल्पना दिली होती. परिषदेच्या कामात सुधारणा करण्याची गरज आहे. कुस्तीगीरांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं. एकेकाळचे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी व अनेक खेळाडूंना तयार करणारे काका पवार यांनीही परिषदेबद्दल तक्रारी केल्या होत्या, असं ते म्हणाले.

'तीन-चार आठवड्यांपू्र्वी मी लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत सावध केलं होतं. परिषदेबद्दलच्या तक्रारी अखिल भारतीय कुस्तीगार परिषदेपर्यंत गेल्या आहेत. त्यांच्याकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असंही मी त्यांना सांगितलं होतं. शेवटी ती कारवाई झाली. याचा अर्थ कारभारात दुरुस्त्या करण्यास वाव होता. आता यातून मार्ग काढावा लागेल. परिषदेच्या कामावर बंदी आली तर कुस्तीगीरांनाच त्याचा फटका बसेल. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर मर्यादा येतील. त्यामुळं आता लवकरच मी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयात जाऊन संबंधितांची भेट घेणार आहे. राज्य परिषदेच्या कारभारात आवश्यक ते बदल करायला लावून पुन्हा एकदा मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असं पवार म्हणाले.

आमची भूमिका केवळ सहकार्याची!

'मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. मुंबईचा, भारताचा आणि जगाचाही होतो. खो खो, कबड्डी आणि कुस्ती या खेळांच्या संघटनांचं अध्यक्षपदही माझ्याकडं होतं. मात्र, या संघटनांमध्ये काम करताना खेळामध्ये आणि निवडीमध्ये मी कधी लक्ष घालायचो नाही. ते काम त्यातल्या तज्ज्ञांनी बघावं, अशी माझी भूमिका होती. फक्त या संस्थांना काही अडचणी आल्या, शासकीय मदत हवी असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहत असे. आजही आम्ही हे करतो. कुस्तीगीर परिषदही त्यास अपवाद नाही. अध्यक्ष म्हणून मी गेली काही वर्षे काम करतोय. पण अन्य गोष्टींशी माझा संबंध नव्हता. स्पर्धांना मदत मिळवून देणं हे माझं काम होतं. मुळात खेळाच्या संघटनेत आम्ही राजकारण आणतच नाही. त्या संघटनांमध्ये अनेक पक्षाचे लोक असतात. एका विचारानं सगळे काम करतात. तिथं मतदानही होत नाही. कुस्तीगीर परिषदेला स्वत:मध्ये सुधारणा करण्यास उशीर झाला. त्यातून ही कारवाई झाली आहे. त्यात अजिबात राजकारण नाही. इथं राजकीय पक्षांचा काहीच संबंध नाही, असंही पवार म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या