मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune koyta gang : बालसुधारगृहाच्या संरक्षक भीतीला शिडी लावून कोयता गँग फरार; सर्व आरोपी अल्पवयीन

Pune koyta gang : बालसुधारगृहाच्या संरक्षक भीतीला शिडी लावून कोयता गँग फरार; सर्व आरोपी अल्पवयीन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2023 11:26 AM IST

Pune koyta gang : पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या गॅंगच्या सात अल्पवयीन अट्टल आरोपींना अटक केली होती. त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी पळ काढला.

Pune koyta gang
Pune koyta gang (HT_PRINT)

पुणे : पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात ही गॅंग रोज अनेक गुन्हे करत आहे. या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. अशीच एक कारवाई करत अट्टल आरोपी असलेल्या सात आरोपींना अटक करून त्यांना येरवडा येथील पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र या सुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र, या सुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून भिंतीवरून उड्या मारून या सात आरोपींनी पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

या प्रकरणी सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भाेसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष किसन कुंभार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार,  हडपसर भागात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात हडपसर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालन्याय मंडळाच्या आदेशाने अल्पवयीन मुलांची रवानगी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील निरीक्षणगृहात करण्यात आली होती. 

सुधार गृहात रोज होणाऱ्या सत्रा अंतर्गत त्यांना कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान, यातील एकाने इतर आरोपींना फूस लावून, पळून जाण्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी सोमवारी रात्री ११.४५ ते १२.३० च्या सुमारास सुधार गृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून दर्गाच्या कोपऱ्यातून सुधार गृहातून पळ काढला. ही घटना लक्षात येताच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पथकांची स्थापना करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले आहेत.

पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढली आहे. रोज अनेक घटना उघडकीस येत असतांना हे अट्टल सात आरोपी सुधार गृहातून फरार झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. हे आरोपी आणखी काही गुन्हे करण्याची शक्यता आहे. या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग