मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena vs VBA : शरद पवार भाजपचे हस्तक असल्याच्या आंबेडकरांच्या विधानावरून शिवसेना-वंचित युतीत खटके

Shivsena vs VBA : शरद पवार भाजपचे हस्तक असल्याच्या आंबेडकरांच्या विधानावरून शिवसेना-वंचित युतीत खटके

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 27, 2023 11:36 AM IST

Rift in Shivsena-Vanchit alliance : शिवसेना-वंचित बहुजन विकास आघाडीची घोषणा केल्याच्या घटनेला दोन दिवसही उलटत नाही तोच या दोन पक्षांमध्ये खटके उडत असल्याचं दिसून आलं आहे.

Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) chief Uddhav Thackeray and Vanchit Bahujan Aaghadi (VBA) President Prakash Ambedkar
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) chief Uddhav Thackeray and Vanchit Bahujan Aaghadi (VBA) President Prakash Ambedkar (Sandeep Mahankal)

Shivsena vs VBA : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गाजावाजा करत शिवसेना-वंचित बहुजन विकास आघाडीची घोषणा केल्याच्या घटनेला दोन दिवसही उलटत नाही तोच या दोन पक्षांमध्ये खटके उडत असल्याचं दिसून आलं आहे. निमित्त ठरलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर नुकतीच केलेली कठोर टीका. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जुनं राजकीय वैर आहे. शरद पवार हे भाजपचे हस्तक असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राऊत म्हणाले, ‘शरद पवारांविरोधात वक्तव्य करणं आम्हाला अजिबात मान्य नाही. समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरायला हवे. आपल्याला भविष्यात महाविकास आघाडीत एकत्रितपणे काम करायचं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर यांनी युती करताना सांगितलं होतं. भाजपविरोधात भक्कम आघाडी उभारण्यासाठी भूतकाळातले मतभेद दूर ठेवले पाहिजे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांसमोर मांडली होती, असं संजय राऊत म्हणाले.

वंचितच्या युतीबाबत राहुल गांधींशी बोललो

दरम्यान, शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत आघाडी केली असली तरी वंचित हा पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसल्याचं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतच केलं होतं. यावर बोलताना मी वंचितसोबतच्या युतीबाबत थेट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोललो असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे विविध पक्षांसोबत आघाडी करताना उद्धव ठाकरे हे स्थानिक नेत्यांपेक्षा केंद्रीय नेत्यांना अधिक महत्व देत असल्यातं स्पष्ट झालं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या