मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज अखेरचा दिवस; राहुल गांधी जामोदमार्गे मध्यप्रदेशात करणार प्रवेश

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज अखेरचा दिवस; राहुल गांधी जामोदमार्गे मध्यप्रदेशात करणार प्रवेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 20, 2022 08:49 AM IST

Bharat Jodo Yatra In Maharashtra : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात अखेरचा दिवस आहे. जामोदमार्गे ही यात्रा संध्याकाळी मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.

Bharat Jodo Yatra In Maharashtra
Bharat Jodo Yatra In Maharashtra (AICC)

Bharat Jodo Yatra In Madhya Pradesh : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते केरळ अशी ३५०० किलोमीटरची पदयात्रा काढली आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा प्रवास करत गेल्या सात नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली होती. परंतु आता भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रातील १४ दिवसांचा प्रवास पूर्ण केला असून आज यात्रेचा राज्यात अखेरचा दिवस आहे. यावेळी कॉंग्रेस नेते पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतर यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

भारत जोडो यात्रेचा मुक्काम बुलढाण्यातील भेंडवळ या गावात होता. यावेळी राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आज सकाळी ते पुढील मार्गासाठी निघाले आहेत.

भारत जोडो यात्रेचं आजचं वेळापत्रक काय आहे?

सकाळी सहा वाजता भारत जोडो यात्रा बुलढाण्यातील भेंडवळमधून निघालेली आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत ही पदयात्रा जामोदमधील सातपुडा एज्युकेशन सोसायटीपर्यंत पोहचेल. त्यानंतर यात्रेकरू विश्रांतीसाठी थांबणार आहेत. सकाळी १०.३० वाजता कॉंग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतर दुपारी चार वाजता संविधान चौक जामोदपासून निघणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता जळगावातील निमखेडी पोलीस ठाण्याजवळ पोहचेल. त्यानंतर भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल...

शेतकऱ्यांचा आवाज हा देशाचा आवाज असून केंद्रानं काही मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी तीन काळे कायदे शेतकऱ्यांसाठी आणले. परंतु शेतकऱ्यांनी मोठा लढा दिल्यानंतर त्यांना हे कायदे मागे घ्यावे लागले. परंतु आधीच शेतकऱ्यांचा विचार केला असता तर ८०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला नसता, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

IPL_Entry_Point