मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नितीन गडकरींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात

नितीन गडकरींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 19, 2022 04:45 PM IST

BS Koshyari In Aurangabad : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा नव्या राजकीय वादात अडकले आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

Governor BS Koshyari Statement : राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे सातत्यानं महाराष्ट्रातील महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह ज्योतीबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची केल्यानं ते पुन्हा नव्या वादात अडकले आहेत. त्यामुळं आता नव्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली जात आहे.

औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिक्षांत समारोह सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी-लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. परंतु सध्याचे आदर्श हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, असं वक्तव्य करून राज्यपाल कोश्यारी यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

तुमचे आदर्श व्यक्ती कोण हे आमच्या शाळेत विचारलं जायचं. परंतु आता महापुरुष शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रात तुम्हाला अनेक संत, महात्मे आणि महापुरुष मिळून जातील. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून तर नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक महापुरुष तुम्हाला मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

हे धंदे बंद करा- संभाजी ब्रिगेड

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यपाल कोश्यारी हे वाचाळवीरासारखे वळवळ करत असतात. त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असले धंदे बंद करायला हवेत, अशा शब्दांत संतोष शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सुनावलं आहे.

IPL_Entry_Point