पुणे - पुण्यातील धायरीमध्ये भीषण अग्नितांडव घडले असून ६ कारखाने आगीत जळून खाक झाले आहेत. धायरीमध्ये गणेश नगर, गल्ली क्रमांक २२ येथील एका कारखान्यात आग लागली व अन्य कारखान्यात पसरत गेली. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ८ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतरही भीषण आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं. धायरीमध्ये लागलेल्या या आगीत परिसरातील ६ छोटे कारखाने जळून खाक झाले आहेत. फर्निचर, वाहन दुरुस्ती, रंग स्प्रे निर्मितीचे हे कारखाने होते. आगीनंतर गॅस सिलिडर आणि केमिकल बॅरलचे अनेक स्फोट ऐकू येत होते. या आगीत २ मोटारसायकील व २ चाकचाकी वाहनांनीही पेट घेतला. पुणे आणि पीएमआरडीएच्या १० वाहनांच्या साहाय्याने ही आग पूर्ण विझवली. या आगीत प्रचंड आर्थिक हानी झाली असली तरी सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालं नाही किंवा जिवितहानी झाली नाही.
संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती तर ९ वाजता कुलिंग काम सुरू झालं. रंग निर्मिती कारखान्यामध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली होती. रंगनिर्मिती कारखान्याच्या आतील सिलिंडरचे ८ ते १० स्फोट होऊन आग पसरली. या आगीमुळे नागरी वस्त्यांमधील केमिकल कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या वर्षभरातील अशाप्रकारची ही आठवी घटना आहे,म्हणून पालिकेनं या भागात सुरक्षा संबंधीच्या प्रश्नावर ऑडिट करावं, अशी मागणी धायरीतील रहिवाशांनी केली आहे.
संबंधित बातम्या