Navi Mumbai Crime News Marathi : ट्यूशनसाठी पैसे देण्याचं आमिष दाखवत एका शिक्षिकेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला पैशांचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. गणेश वर्मा असं आरोपीचं नाव असून तो गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक महिलेवर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश वर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश वर्माने नवी मुंबईतील एका खाजगी ट्यूशनमध्ये काम करत असलेल्या महिलेला पैशांचं आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर आरोपी गणेशने पीडितेवर सातत्याने शारीरिक संबंध ठेवत महिलेची फसवणूक केली. या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास आरोपीने महिलेला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर आरोपीच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेने थेट आरसीएफ पोलीस स्टेशन गाठत आरोपी गणेश वर्मा याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत आरोपी गणेशला अटक केली आहे.
आरोपी गणेश वर्मा याने अनेकदा महिला शिक्षिकेवर चेम्बूर कॅम्पमध्ये अनैसर्गिक बलात्कार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. याशिवाय आरोपीने महिलेला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कोठडीत रवानगी केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका तरुणीचा विनयभंग करण्याची घटना समोर आली होती, त्यानंतर आता महिला शिक्षिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.