मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्र म्हणजे काय हास्यजत्रा नाही, चंद्रकांत पाटलांनी विचार करून बोलावं; सुप्रिया सुळे संतापल्या

महाराष्ट्र म्हणजे काय हास्यजत्रा नाही, चंद्रकांत पाटलांनी विचार करून बोलावं; सुप्रिया सुळे संतापल्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 12:19 PM IST

Supriya Sule vs Chandrakant Patil : स्वस्त आणि मस्त शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण क्षेत्रातच जर भ्रष्टाचार होत असेल तर हे मोठं पाप असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली आहे.

Supriya Sule vs Chandrakant Patil
Supriya Sule vs Chandrakant Patil (HT)

Supriya Sule vs Chandrakant Patil : राज्यातील खाजगी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या पगाराच्या आणि रिक्त पदांच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांवर आगपाखड केली आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापकांना पगार देऊन नवीन पदभरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्याला उत्तर देताना सुळे म्हणाल्या की, जर इतका मोठा मंत्री प्राध्यापकांना आश्वासन देत असेल तर त्यांनी निधी तयार ठेवलेला असेल. आणि जर असं घडलेलं नसेल तर निधी नसतानाही त्यांनी ही घोषणा कशी काय केली? असा सवाल करत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली आहे.

जेव्हा एखादा मंत्री बोलतो, तेव्हा त्याला लाईटली किंवा चेष्टेवारी घ्यायचं नसतं. परंतु गंमतजंमत करण्याचा अधिकार मंत्र्यांनाही नाही, चंद्रकांत पाटलांनी बोलताना विचार करून बोलावं, महाराष्ट्र काय हास्यजत्रा नाही, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री सातत्यानं बेजबाबदार वक्तव्ये करत असल्यानं काळजी वाटतेय, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांसह आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील प्राध्यापकांचे पगार करून नवीन २०७२ प्राध्यापकांची भरती करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याशिवाय प्राध्यापकांचे पगार करण्यासाठी खासगी महाविद्यालयांना फी कमी करावी लागेल, असंही वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.

IPL_Entry_Point