मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: संयमाला मर्यादा असतात; सीमावादावरून शरद पवारांचा कर्नाटकला थेट इशारा

Sharad Pawar: संयमाला मर्यादा असतात; सीमावादावरून शरद पवारांचा कर्नाटकला थेट इशारा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 06, 2022 07:38 PM IST

Sharad Pawar on maharashtra karnataka border dispute: सीमा प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेचा संयम सुटू नये याची जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar on maharashtra karnataka border dispute: 'महाराष्ट्र-कर्नाटकामधील सध्याचा वाद हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. एकदा नव्हे, दोन-तीनदा त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. आज महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाला आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील जनता संयम राखून आहे, पण संयमाला मर्यादा असतात. हा संयम सुटू नये याची काळजी कर्नाटक व केंद्र सरकारनं घ्यायला हवी. अन्यथा उद्रेक झाल्यास त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

बेळगाव जवळच्या हिरेबागवाडी इथं कर्नाटकातील काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर शरद पवार यांनी आज मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. हा विषय कसा सुरू झाला हे सांगून त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेली वक्तव्यंच वाचून दाखवली. सीमावादाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. तिथं दोन्ही राज्यांनी आपली भूमिका मांडणं अपेक्षित आहे. मात्र, कायद्यावर विश्वास नसल्याप्रमाणं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक वक्तव्य केली. त्यावर काही घटकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केली गेली, असं पवार म्हणाले.

'सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रतिनिधींकडून मला काही माहिती मिळाली आहे. एक प्रकारची दहशत तिथं निर्माण केली जात आहे. पोलिसांचा वापर केला जात आहे. लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. तिथल्या मराठी भाषिकांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राची भूमिका अजूनही संयमाची आहे. ती कायम राहावी असं मला वाटतं. अन्यथा देशाच्या ऐक्याला तडा जाऊ शकतो. केंद्र सरकारला याबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही. उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडं हा विषय मांडावा अशी माझी अपेक्षा आहे. पुढच्या २४ तासांत या हल्ल्याच्या घटना थांबल्या नाहीत तर होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री व सरकारची राहील, असंही शरद पवार यांनी ठणकावलं.

अशी शंका लोकांना आहे - शरद पवार

कर्नाटकचे मुख्यमंत्री अचानक सीमाप्रश्नावर आक्रमक होण्यामागे आगामी निवडणुकांचं गणित आहे का असं शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर, मला त्याबाबत काही सांगता येणार नाही. यापूर्वीही अनेकदा वाद झाला होता. मात्र, कर्नाटकच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी अशी चिथावणीखोर वक्तव्य केली नव्हती. निवडणुका होत असतात. पण त्यासाठी माणसामाणसांमध्ये व दोन वेगवेगळ्या भाषिकांमध्ये कटुता निर्माण करणं घातक आहे.

IPL_Entry_Point