मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव

Voilence : महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाला हिंसक वळण; बेळगावात पाच वाहनांवर हल्ला, परिसरात तणाव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 02:08 PM IST

Voilence On Maharashtra-Karnataka Border : आज सकाळीच कर्नाटक सरकारनं सीमाभागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर आता बेळगावात महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर तुफान हल्ला करण्यात आला आहे.

Voilence On Maharashtra-Karnataka Border
Voilence On Maharashtra-Karnataka Border (HT)

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमेवरून सुरू झालेल्या लढाईला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळीच कर्नाटक सरकारनं सीमाभागात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर आता बेळगावात महाराष्ट्रातील पाच वाहनांवर तुफान हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. बेळगावातील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची पासिंग असलेल्या पाच वाहनांवर हल्ला केला असून त्यात कुणी जखमी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच कन्नड रक्षण वेदिका या संघटनेनं महाराष्ट्रात प्रवेश करत कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेणाऱ्या गावांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून बंगळूरुच्या दिशेनं निघालेल्या महाराष्ट्राच्या पाच वाहनांवर बेळगावातील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. याशिवाय महाराष्ट्राची पासिंग असलेल्या प्रत्येक वाहनावर उभं राहून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाभागात धुडगूस घालणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हिंसाचार प्रकरणात पहिली अटक...

बेळगावातील टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिका या आक्रमक संघटनेचा पदाधिकारी नारायण गौडा याला अटक केली आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक आणि महाराष्ट्राविरोधात घोषणाबाजी करत कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांचा दौरा रद्द...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट या तीन शहरांवर दावा ठोकल्यानंतर आता महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांनी बेळगावात जाऊन मराठी भाषिकांच्या समस्या समजून घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊन वातावरण खराब करू नये, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्यानंतर आता दोन्ही मंत्र्यांचा संभावित दौरा रद्द करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point