मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Belgaum Voilence : फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; सीमाभागातील हिंसाचाराचा केला निषेध

Belgaum Voilence : फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; सीमाभागातील हिंसाचाराचा केला निषेध

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 03:39 PM IST

Belgaum Karnataka Voilence : बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून घटनेचा निषेध केला आहे.

Maharashtra-Karnataka Border Dispute
Maharashtra-Karnataka Border Dispute (HT)

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात पुण्याहून बंगळुरुच्या दिशेनं जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पाच ते सहा वाहनांवर दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता दोन्ही राज्यांत सीमावादाच्या प्रश्नावरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून बेळगावातील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला आहे.

बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करणाऱ्या कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फडणवीसांना सांगितलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना दुरध्वनीद्वारे दिली आहे.

बेळगावातील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची पासिंग असलेल्या पाच वाहनांवर हल्ला केला होता. याशिवाय महाराष्ट्राची पासिंग असलेल्या प्रत्येक वाहनावर चढून महाराष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. या धक्कादायक घटनेविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून अनेक नेत्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांच्या बेळगाव दौऱ्याआधीच ही घटना घडल्यानं सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

बेळगावातील हिंसाचाराविरोधात राज्यात संतापाची लाट...

बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेनंतर कर्नाटक सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. याशिवाय कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांसोबत आपण चर्चा करणार असल्याचं मंत्री शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची शिंदे गटावर टीका...

राज्यातील मिंधे सरकारनं दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकल्यानंच महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचं काम कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले होत असतील तर त्याला आम्ही उत्तर दिलं तर काय होईल?, असा सवालही सावंत यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केला आहे.

IPL_Entry_Point