मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satyajeet Tambe : काँग्रेसचा सत्यजीत तांबेंना झटका; निलंबित केलं ते केलं, वर अडचणी वाढवून ठेवल्या

Satyajeet Tambe : काँग्रेसचा सत्यजीत तांबेंना झटका; निलंबित केलं ते केलं, वर अडचणी वाढवून ठेवल्या

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 19, 2023 07:24 PM IST

Congress suspends Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातील बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

Satyajeet Tambe - Nana patole
Satyajeet Tambe - Nana patole

Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे युवा नेते सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं दणका दिला आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पक्षानं तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. इतकंच नव्हे तर तांबे यांच्या पराभवासाठीही काँग्रेसनं कंबर कसली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सत्यजीत तांबे यांना निलंबित केल्याची माहिती दिली. सत्यजीत तांबे यांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. ते अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय कुणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा आणखी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, असं सांगत, पटोले यांनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचा निर्णय जाहीर केला.

MPCC
MPCC

शुभांगी पाटील या सुरुवातीपासूनच पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, भाजपनं शेवटपर्यंत उमेदवारच घोषित केला नाही. उलट तांबे यांनाच पाठिंबा देण्याचे संकेत भाजपच्या नेते देत होते. त्यामुळं पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अर्ज भरल्यानंतर शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्यानं पक्ष फेरविचार करेल व त्यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देईल, असा अंदाज होता. मात्र, पक्षानं त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला व शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शिवसेनेनं याआधीच पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं तीच भूमिका घेतली. त्यामुळं तांबे यांच्यापुढं आता कडवं आव्हान उभं ठाकलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात मागील सलग तीन टर्म काँग्रेसचे सुधीर तांबे निवडून येत आहेत. मात्र, सत्यजीत तांबे हे आता अपक्ष असल्यानं या निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे. शुभांगी पाटील या मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point