मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election : आघाडीचा नाशिकचा उमेदवार अखेर ठरला! शुभांगी पाटील देणार सत्यजीत तांबे यांना आव्हान

MLC Election : आघाडीचा नाशिकचा उमेदवार अखेर ठरला! शुभांगी पाटील देणार सत्यजीत तांबे यांना आव्हान

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 19, 2023 03:33 PM IST

Maha Vikas Aghadi backs Shubhangi Patil : राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत.

Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadi

Nana Patole : माघार, बंडखोरी व नाराजीमुळं कधी नव्हे इतकी चर्चेत असलेल्या राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं आपले पाचही अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. सर्वांचं लक्ष लागलेल्या नाशिक मतदारसंघात आघाडीनं शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना बळ देत पाठिंबा जाहीर केला आहे.

विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या शिक्षक व पदवीधर सदस्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघातून बाळाराम पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या काळात वाढलेली बेरोजगारी व महागाईच्या विरोधात जनतेमध्ये विशेषत: सुशिक्षित वर्गामध्ये असंतोष आहे. त्यांचं प्रतिबिंब या निवडणुकीत पडेल व महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्यजीत तांबे यांच्यापुढं आव्हान

नाशिक पदवीधर मतदारसंघात वडिलांना उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडून व काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष रिंगणात उतरलेले सत्यजीत तांबे यांच्यापुढं महाविकास आघाडीनं आव्हान निर्माण केलं आहे. या मतदारसंघात आघाडीनं एकमतानं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं तीन वेळा इथून आमदार राहिलेले सुधीर तांबे व त्यांचे चिरंजीव सत्यजीत यांची कसोटी लागणार आहे.

बाळासाहेब थोरात प्रचार करणार का?

बंडखोरी केल्यामुळं पक्षातून निलंबित करण्यात आलेले सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळं बाळासाहेब थोरात त्यांच्या विरोधात प्रचार करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारला. त्यावर, बाळासाहेब थोरात हे पक्षाचे नेते आहेत. मी त्यांच्या संपर्कात आहे. आता ते रुग्णालयात आहेत. मात्र, घरी परतल्यावर ते निश्चितच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

 

IPL_Entry_Point