मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amritpal Singh : पंजाबमधील फरार आरोपी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात?, राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्टवर
Amritpal Singh News Live
Amritpal Singh News Live (HT_PRINT)

Amritpal Singh : पंजाबमधील फरार आरोपी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात?, राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्टवर

21 March 2023, 19:45 ISTAtik Sikandar Shaikh

Amritpal Singh Punjab : खालिस्तानच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन करणारा फरार आरोपी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Amritpal Singh News Live : वेगळ्या खालिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमधील पोलीस ठाण्यावर आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्या वारीस दे पंजाब संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याचा पंजाब पोलिसांकडून देशातील अनेक राज्यांमध्ये शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून पोलीस त्याच्या मागावर असून त्यानंतर आता अमृतपाल सिंग महाराष्ट्रात लपून बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण आता अमृतपाल सिंग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. अमृतसरमधून राज्यातील नांदेडमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळं नांदेड पोलिसांकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या ज्या प्रकारे पंजाबमध्ये पोलीस अमृतपाल सिंग याला शोधत आहे, ते पाहता अमृतपाल सिंग दुसऱ्या राज्यात पसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पंजाबनंतर देशभरातील पोलीस सक्रिय झाले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधून फरार झालेला अमृतपाल आणि त्याचे समर्थक हे नांदेडसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलीस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या बसेस, रेल्वे आणि इतर वाहनांवर नजर ठेवून असल्याची माहिती आहे. केंद्रातील मोदी सरकारनं पंजाब सरकारला सूचना केल्यानंतर तपास यंत्रणांकडून खालिस्तानी अमृतपाल सिंग याला शोधण्याच्या कार्याला वेग आला आहे.

अमृतपाल सिंग पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाल्यानंतर हे प्रकरण पंजाब-हरयाणा हायकोर्टापर्यंत पोहचलं आहे. त्यानंतर हायकोर्टानं अमृतपाल पळून गेल्यामुळं पंजाब सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. पंजाब सरकारकडे ८० हजार पोलीस कर्मचारी आहे, तरी देखील तुम्ही अमृतपालला बेड्या का नाही ठोकू शकलात?, असा सवाल हायकोर्टानं पंजाब सरकारला केला आहे. त्यामुळं आता अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी देशभरातील पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.