मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Scholarship Exam: गरिबीवर मात करत मुंबई महापाल‍िकेच्या ५ व‍िद्यार्थ्यांची स्कॉलरशीप परीक्षेत बाजी

Scholarship Exam: गरिबीवर मात करत मुंबई महापाल‍िकेच्या ५ व‍िद्यार्थ्यांची स्कॉलरशीप परीक्षेत बाजी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 01, 2023 04:02 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच पाच व‍िद्यार्थी National Means cum Merit Scholarship परिक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये झळकले असून या व‍िद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

राष्ट्रीय श‍िष्यवृत्ती परीक्षेत मुंबई महानगरपाल‍िकेच्या पाच व‍िद्यार्थ्यांना श‍िष्यवृत्ती
राष्ट्रीय श‍िष्यवृत्ती परीक्षेत मुंबई महानगरपाल‍िकेच्या पाच व‍िद्यार्थ्यांना श‍िष्यवृत्ती

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (National Means cum Merit Scholarship Scheme Exam) मध्ये मुंबई महानगरपाल‍िकेच्या शाळांमधील पाच व‍िद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून बाजी मारली आहे. महानगरपालिका शिक्षण विभागाच्या इतिहासात या परीक्षेत प्रथमच तब्बल पाच व‍िद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये झळकले असून या व‍िद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून पुढील चार वर्ष दरमहा १ हजार रुपये स्कॉलरशीप मिळणार आहे. 

या यशवंत विद्यार्थ्यांमध्ये खुशी महेश कोकर (रमाबाई सहकार नगर महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २, मुंबई उत्तर); दक्षता मनोहर ऐलमकर (सिटी ऑफ लास एंजलिस महानगरपालिका मराठी शाळा, मुंबई दक्षिण); वेदांती मेघश्याम मोरे (गोशाळा महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक १, मुंबई उत्तर);  रहमान शफिक शेख (देवनार वसाहत महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २, मुंबई उत्तर) आणि उमर हुसेन जियाउद्दीन शेख (अंधेरी पश्चिम मुंबई पब्लिक स्कूल) या व‍िद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिर‍िक्त महानगरपाल‍िका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी आदींनी या विद्यार्थ्यांचे तसेच या व‍िद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श‍िक्षकांचे अभ‍िनंदन केले आहे. महानगरपालिका शाळांचे विद्यार्थीसुद्धा राज्यस्तरावरील स्पर्धा परीक्षेत उतरून असे घवघवीत यश संपादन करू शकतात, हे या यशाने अधोरेखित केले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

काय आहे ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती’ परीक्षा?

‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती’ ही संपूर्ण भारतात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आहे. महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येते. गत वर्षी २१ डिसेंबर २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील इयत्ता आठवातील ४० विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झाले होते. त्यातील एकूण पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

परीक्षेची उद्दिष्टे

इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, तसेच श‍िक्षणासह आर्थ‍िक सहाय्य मिळावे, विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आण‍ि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा घेण्यात येते.

श‍िक्षणासाठी मिळते पाठबळ

केंद्र शासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालयाने २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर एकाच दिवशी एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा एक हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. आता या पाच विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षे म्हणजे इयत्ता १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील शिष्यवृत्ती मिळव‍िण्यासाठी इयत्ता ९ वी व ११ वी मध्ये किमान ५५ टक्के तसेच इयत्ता दहावीत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

IPL_Entry_Point

विभाग