मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘निवदेन दिलं की नुसते हसतात, बाष्कळ जोक करतात, असे राज्यपाल असतात का?’

‘निवदेन दिलं की नुसते हसतात, बाष्कळ जोक करतात, असे राज्यपाल असतात का?’

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 05, 2022 02:16 PM IST

Maharashtra Congress Protest: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

Bhai Jagtap
Bhai Jagtap

 Mumbai Congress President Bhai Jagtap slams Bhagat Singh Koshyari: महागाई, बेरोजगारी व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेसनं आज राजभवन घेराव आंदोलन केलं. मुंबईत शहराध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर आक्रमक झालेल्या जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ‘आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, चोर नाही,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

'केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी इंग्रजांच्या काळाप्रमाणे वागतायत, त्यांना कसं वागायचं ते वागू द्या. आमचा आक्षेप नाही. पण राज्यघटनेनं आम्हाला आमची बाजू मांडण्याचा, आंदोलनं करण्याचा अधिकार दिला आहे. तो कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आमच्या कार्यकर्त्यांना अटक का आणि कोणाच्या आदेशावरून केली जात आहे? कोण आहे देवेंद्र फडणवीस? कोण आहेत एकनाथ शिंदे? माझ्या देशाच्या घटनेपेक्षा ते मोठे आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

‘आम्ही घटनेच्या चौकटीत राहून आंदोलन करतोय. सगळं काही शांतपणे करत आहोत. आम्हाला दहा ठिकाणी अडवण्यात आलं. लोकांना घरातून बाहेर येऊ दिलं जात नाही. अनेक कार्यकर्त्यांना रातोरात अटक करण्यात आली आहे. आम्ही काय चुकीचं करतोय? महागाई, बेरोजगारी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राविरोधात केलेल्या विधानाच्या विरोधात आम्ही निदर्शनं करतोय. राज्यघटनेच्या अधीन राहून आम्ही आंदोलन करतंय तर तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही कुणी चोर नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत,’ असं जगताप म्हणाले.

‘गरिबी, महागाईचे मुद्दे आम्ही सतत मांडत आलो आहोत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आम्ही जवळपास २० ते २५ निवदेनं दिली आहेत. पण निवेदनं घेऊन ते नुसतं हसतात. आम्ही कधी ऐकले नसतील असे बाष्कळ जोक करत राहतात. आम्ही सुद्धा राजकारणात ४० वर्षे काढली आहेत. लोकशाहीत एखाद्या घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती असं वागते हे भयंकर आहे. असे राज्यपाल पाहिले नाहीत,’ असा त्रागाही त्यांनी व्यक्त केला.

IPL_Entry_Point