मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री शिंदे एक-दोन तासच झोपतात, खूप दगदग करून घेतलीय : दीपक केसरकर

मुख्यमंत्री शिंदे एक-दोन तासच झोपतात, खूप दगदग करून घेतलीय : दीपक केसरकर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 05, 2022 01:47 PM IST

CM Eknath Shinde Health: आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना असंही सांगितलंय की, तुमच्या तब्येतीची काळजी घेतलीत तर लोकांची अधिक चांगली सेवा करू शकला असंही सांगितल्याचं केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रकृतीबद्दल दीपक केसरकर यांनी दिली माहिती
मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रकृतीबद्दल दीपक केसरकर यांनी दिली माहिती (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

CM Eknath Shinde Health: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागल्याने काल गुरुवारी त्यांच्या सर्व प्रशासकीय बैठका आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. रात्री उशिरा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलातना मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्यास सांगितलं असल्याचं सांगितलं.

दीपक केसरकर म्हणाले की, "मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत असल्याचंही कळवलं आहे. मी भेटलो तेव्हा त्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरू होती. खरंतर त्यांनी स्वत:ची फार दगदग करून घेतली आहे."

मुख्यमंत्र्यांना अपुरी झोप मिळाल्यामुळे हा त्रास झाला आहे. गेले अनेक दिवस ते नीट झोपलेले नाहीत. महाराष्ट्र दौरा केला तेव्हा रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत असतात. त्या लोकांना न भेटता जाणं योग्य वाटत नसल्यानं ते भेटूनच जात होते. त्यामुळे पाच ते सहा वाजता झोपायचं आणि पुन्हा सात वाजता उठून पुढचा दौरा असं चाललं आहे. एक दोन तासांची झोप कुणालाही पुरेशी नाही असंही दीपक केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्याभरापासून पुरेशी झोप घेतलेली नाही. आम्ही त्यांना विश्रांती घेण्याची विनंती केली आहे. आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना असंही सांगितलंय की, तुमच्या तब्येतीची काळजी घेतलीत तर लोकांची अधिक चांगली सेवा करू शकला असंही सांगितल्याचं केसरकर म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या