मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar : 'मराठी माणसाला गाडा आणि मॉल चालवा, हेच शिवसेनेचं मिशन’

Ashish Shelar : 'मराठी माणसाला गाडा आणि मॉल चालवा, हेच शिवसेनेचं मिशन’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 05, 2022 12:45 PM IST

Ashish Shelar on Saamana Editorial : मुंबई महापालिकेत अमराठी बिल्डरांना पोसून शिवसेनेनं तीन लाख कोटींचं कमिशन खाल्ल्याचा आरोप आशिष शेलारांनी केला आहे.

Ashish Shelar on Saamana Editorial
Ashish Shelar on Saamana Editorial (HT_PRINT)

Ashish Shelar on Saamana Editorial : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर असून आज ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. याशिवाय शहा हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणनिती आखणार असल्याची माहिती आहे. परंतु गृहमंत्री शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टीका केली होती. भाजप फोडा, झोडा आणि राज्य करा अशी रणनिती वापरून विरोधकांना संपवत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. परंतु आता त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार यांनी शिवसेनेला उत्तर देताना 'फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा' या शीर्षकाखाली एक पत्रक जारी करून उत्तर दिलंय, त्यात त्यांनी म्हटलंय की, स्वत:चं अपयश झाकण्यासाठी मराठी माणसाची शाल अंगावर कशाला घेताय? फोडा-झोडा सोडा तुमचं तर मुंबईत मराठी माणसाला गाडा आणि मॉल चालवा, हेच मिशन सुरू असल्याची टीका आशिष शेलारांनी शिवसेनेवर केली आहे.

शेलार म्हणाले की, शिवसेनेनं मराठी माणसात फूट पडल्याची दिलेली आरोळी ही शंभर टक्के खोटी आहे. मुंबई महापालिकेत अमराठी बिल्डरांनी शिवसेनेनं पोसून जवळपास तीन लाख कोटींचं कमिशन खाल्लं आहे. शहरातील गिरणी कामगारांना कुणी उध्वस्त केलं? मराठी पोरांना वडापाव विकायला कुणी लावलं?, हे सगळं असतानाही शिवसेना मराठी माणसाच्या नावानं गळे काढत असल्याचा आरोप शेलार यांनी शिवसेनेवर केलाय.

दुसऱ्यांवर फोडाफोडीचा आरोप करता, पण पालिकेच्या मराठी शाळा कुणी फोडल्या? सचिन वाझेला वसूलीसाठी कुणी बसवलं? डॉ. अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसांवर गोळीबार करणाऱ्या कॉंग्रेससोबत सत्तेत कोण बसलं? हे सर्व केवळ अहंकारातून सुरू असून पेग्विनसेनेचं अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचं मिशन सुरुच असल्याचा घणाघात शेलारांनी शिवसेनेवर केला आहे.

IPL_Entry_Point