मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Msrtc bus: ‘त्या’ जाहिरातप्रकरणी तीन एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे, कामावर रुजू होण्याचे आदेश

Msrtc bus: ‘त्या’ जाहिरातप्रकरणी तीन एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे, कामावर रुजू होण्याचे आदेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 06, 2023 11:40 PM IST

Msrtc st bus advertisement : महामंडळाच्या बसवरशिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात व्हायरल झाली होती. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे.

व्हायरल झालेला फोटो
व्हायरल झालेला फोटो

दुरवस्था झालेल्या  व अक्षरश: खिळखिळी झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात व्हायरल झाली होती. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना  निलंबित करण्यात आले होते. विरोधकांकडून व राज्यातील सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर अखेर या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. भूम एसटी डेपोतील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन माघार घेत अखेर त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश भूम डेपो व्यवस्थापनाने दिले आहेत. 

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री  फडणवीस यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. 

खिडक्यांची व बसण्याची व्यवस्थाही नसलेल्या बसवर राज्य सरकारची जाहिरात असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची दखल घेत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार सडकून टीका केली होती. मात्र जुनाट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि भूममधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा सरकारवर टीका करत सरकारची कृती म्हणजे आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी असा टोला लगावला होता. 

अजित पवार यांनी बसची दुरावस्था व त्यावर सरकारची जाहिरात याचे विदारक सत्य विधीमंडळात मांडल्यानंतर खळबळ उडाली. दुरावस्था झालेल्या बसचा जाहिरातीसह फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्या जाहिरातीसाठी तीन कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. 

या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. बसच्या दुरवस्थेचा विषय मार्गी लागून नवीन बस मिळतील अशी आशा होती. मात्र उलट निलंबन करण्यात आलं. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने ही बस प्रवाशांसाठी वापरण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं. सध्या बसचा तुटवडा आहे, त्यामुळे या बस वापरण्यात आल्या आणि त्यामध्ये आमची काय चूक आहे असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला होता. त्यामुळे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे. 

IPL_Entry_Point