MNS Teaser : ‘तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी...’ मनसेच्या मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज
MNS Padwa Melava : मनसेच्या गुडीपाडवा मेळावा येत्या २२ मार्चला शिवाजी पार्कवर होणार आहे. त्याची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
MNS Padwa Melava Teaser : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा येत्या २२ मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. त्यामुळं मनसेच्या नेत्यांनी शिवाजी पार्कवरील व्यासपीठाचं पूजन करत जोरदार तयारी सुरू केली आहे. याशिवाय पाडव्याचा दुसरा टीझर मनसेकडून शेयर करण्यात आला आहे. 'तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी, चला शिवतीर्थावर' असं कॅप्शन नव्या टीझरला देण्यात आलं आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेकडून जोरदारपणे वातावरण तापवण्यात येत आहे. टीझरमध्ये राज्यातील मशिदींवरील भोंग्याचा विषय मनसेनं काढला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा उल्लेख मनसेच्या नव्या टीझरमध्ये करण्यात आला आहे. मशिदींवरील भोंगे बंद करणं, हीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, राज ठाकरेंच्या आंदोलनामुळंच बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होत असल्याचं नव्या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. मविआचं सरकार सत्तेत असताना राज ठाकरेंच्या मनसेनं मशिदींवरील भोंग्यांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली होती. त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मनसेच्या पाडवा मेळाव्यात याच मुद्द्यावर राज ठाकरे बोलणार असल्यामुळं त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी आतापर्यंत दोन टीझर जारी करण्यात आले आहेत. मनसेच्या पाडवा मेळाव्याचा एक टीझर यापूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता दुसरा टीझर जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसैनिकांच्या मेळाव्यात पाडवा मेळाव्यात भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले होते. याशिवाय त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळं आता पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.