मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच लाखांचे दागिने लंपास

Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच लाखांचे दागिने लंपास

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 04:54 PM IST

Bageshwar Dham Sarkar : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bageshwar Dham Dhirendra Shastri Program In Mumbai
Bageshwar Dham Dhirendra Shastri Program In Mumbai (HT)

Bageshwar Dham Dhirendra Shastri Program In Mumbai : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईतील मीरा रोड परिसरात दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिव्य दरबाराच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल पाच लाखांचे दागिने चोरट्यांनी चोरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दिव्य दरबाराला हजेरी लावण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या लाखो अनुयायी कार्यक्रमात पोहचले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

धिरेंद्र शास्त्रींच्या दिव्य दरबाराच्या कार्यक्रमात गळ्यातील मंगळसू्त्र चोरीला गेल्याची तक्रार तब्बल ३६ महिलांनी दिली आहे. या दागिन्यांची किंमत पाच लाख रुपये असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दिव्य दरबाराच्या कार्यक्रमावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतानाही चोरीच्या घटना घडल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक महिलांचं मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केल्यामुळं चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. मुंबईच्या मीरा रोड येथे धिरेंद्र शास्त्री यांचा दोन दिवसीय दिव्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. त्यात भाविकांसाठी आशीर्वाद आणि विभूती वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला मविआचा विरोध...

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याशिवाय त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचाही आरोप करण्यात येतो. त्यामुळं अशा वादग्रस्त बाबाला महाराष्ट्रात कार्यक्रमाची परवानगी कशी काय देण्यात आली?, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel