मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अपक्ष आमदारांच्या वादात शिंदे-फडणवीसांची फजिती; विरोधकांच्या आरोपांना बळ मिळाल्यानं सरकार अडचणीत?

अपक्ष आमदारांच्या वादात शिंदे-फडणवीसांची फजिती; विरोधकांच्या आरोपांना बळ मिळाल्यानं सरकार अडचणीत?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 09:40 AM IST

Ravi Rana vs Bacchu Kadu : भाजपचे सहयोगी आमदार रवि राणा यांनी प्रहारचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर ‘ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी पैसे घेतल्याचा’ आरोप केला आहे. त्यावरून राजकीय वादंग पेटलं आहे.

Ravi Rana vs Bacchu Kadu
Ravi Rana vs Bacchu Kadu (HT)

Ravi Rana vs Bacchu Kadu : राज्यातील सत्तांतरांची लढाई संपून काही महिनेही उलटलेले नाही. शिवसेनेतून बंड करण्यासाठी भाजपनं शिंदे गटाच्या आमदारांना ५० कोटी रुपये दिल्याचा आरोप अनेकदा विरोधकांनी केलेला आहे. त्यातच आता भाजपचे सहयोगी आमदार रवि राणा यांनी ‘ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी पैसे घेतल्याचा’ आरोप शिंदे समर्थक प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळं आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय जे आरोप गेली अनेक दिवस सातत्यानं विरोधी पक्षाचे नेते करत होते, तेच आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदारानं केल्यानं ऐन विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधीच विरोधकांना आयतं कोलित मिळालं आहे.

नेमकं काय झालं?

अमरावती शहरात भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जेष्ठ अभिनेते शक्ती कपूर आणि श्रेयस तळपदे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार रवि राणा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हणाले की, मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, 'ना बाप बडा ना भैया, पैसे सबका रुपया' असं म्हणत त्यांनी स्वत:ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिपाई असल्याचं संबोधलं. याशिवाय ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार बच्चू कडूंनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला.

बच्चू कडूंची भूमिका काय?

आमदार रवि राणांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देताना शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू म्हणाले की, जेव्हापासून आम्ही ठाकरे सरकारमधून बाहेर पडलो, तेव्हापासून आमच्यावर हे आरोप सुरू आहेत. परंतु जेव्हा घरातला कुणी व्यक्ती माझ्यासह ४० आमदारांवर असे आरोप करतो, तेव्हा वाईट वाटतं. मी पैशांशिवाय आणि कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्यानं गेली अनेक वर्ष विधानसभेत निवडून येत आहे. रवि राणांनी कुणाच्या भरवश्यानं हे आरोप केले, त्याची माहिती समोर यायला हवी, असं म्हणत बच्चू कडूंनी रवि राणांना आव्हान दिलं.

सात ते आठ आमदार संपर्कात- कडू

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून कुणी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच रवि राणांनी आम्ही ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप येत्या एक नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर राज्यात धमाका करणार असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडूंनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची फजिती...

येत्या तीन नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. याशिवाय मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वसई विरार आणि औरंगाबाद यांच्यासह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच आता सत्तापक्षातील आमदारानं शिंदे गटाच्या आमदारावर बंड करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानं विरोधकांना आयतं कोलित मिळालं आहे. जे आरोप सातत्यानं विरोधी पक्षांमार्फत केले जात आहे, त्याच आरोपांना भाजपचे सहयोगी आमदार रवि राणांनी बळ दिल्यानं यामुळं भाजप आणि शिंदे गटाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point