मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagat Singh Koshyari: ह्या माणसाला महाराष्ट्राबाहेर काढा; कोश्यारींच्या विरोधात संतापाची लाट

Bhagat Singh Koshyari: ह्या माणसाला महाराष्ट्राबाहेर काढा; कोश्यारींच्या विरोधात संतापाची लाट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 19, 2022 05:53 PM IST

Bhagat Singh Koshyari on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज व अन्य पुरुषांबद्दल पुन्हा एकदा अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

Sambhajiraje on Bhagat Singh Koshyari: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ताळतंत्र सोडलं आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांची नितीन गडकरी यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात कोश्यारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. संभाजीराजे यांनी तर कोश्यारींना राज्याबाहेर पाठवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरणच बनलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. शिवाय, बेताल विधानांमुळंही कोश्यारी अनेकदा अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी शिवाजी महाराजांसह महाराष्ट्रातील महापुरुषांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नव्हे, शिवरायांसह अन्य महापुरुषांची तुलना त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी केली आहे. त्यामुळं राज्यात संतापाचं वातावरण आहे.

संभाजी ब्रिगेड, मनसे अशा पक्षांसह संभाजीराजे भोसले यांनीही कोश्यारी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘राज्यपालांनी सुधारायचंच नाही अस ठरवलेलं दिसत आहे. ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता?, असा सवाल मनसेचे गजानन काळे यांनी केला आहे. 'गडकरीजी, पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा, पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळातही आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, असा संताप मनसेनं व्यक्त केला आहे.

माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही कोश्यारींचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘राज्यपाल असं का बडतात माहीत नाही. संत व महापुरुषांबद्दल यांच्या मनात घाणेरडे विचार येऊच कसे शकतात?, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. 'यांना महाराष्ट्रातून पाठवून द्यायला हवं. अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय, अशी हात जोडून विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

WhatsApp channel