Nana Patole Congress : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मुंबईत आज बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाचे अनेक नेते पवारांच्या बैठकीत उपस्थित राहणार आहे. परंतु आता शरद पवार यांच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत काँग्रेसची स्वतंत्र बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या नेत्यांना फोनाफोनी करत टिळक भवनात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असावी, यासाठी नाना पटोले, अशोक चव्हाण आणि नसीम खान यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहे. त्यामुळं आता मुंबईत महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठकीबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करायचे आहे, त्यासाठी राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून ही प्रक्रिया जून महिन्यापर्यंत पार पाडायची असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे किती नेते मुंबईत आहेत, याची माहिती घेतली जात आहे. आमच्या बैठकीनंतर मविआच्या बैठकीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर देशभरातील विरोधकांच्या एकीला बळ आलं आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळं आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात राजकीय डावपेच टाकले जात असल्याची चर्चा रंगली आहे.