Maharashtra Weather Update : अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्यानंतर आता वाढत्या तापमानामुळं राज्यात चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये दोन, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला उष्माघातामुळं जीव गमवावा लागला आहे. तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळं भरदुपारी नागरिकांनी बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच आरोग्य विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे.
गेल्या आठवड्याभरापासून नाशिकसह मालेगावात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळं उष्माघातामुळं नाशिकमध्ये एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. अकोल्यात अकबर शहा, नांदेडमध्ये विशाल मादसवार आणि संभाजीनगर येथील तातेराव वाघ या नागरिकांचा उष्माघातामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाने अलर्ट जारी करत सार्वजनिक ठिकाणी विशेष पथक नेमण्याची तयारी सुरू केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असल्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. अकोला जिल्ह्यात ४५.६ तर नाशिकमध्ये ३८.७ आणि मालेगावात ४३.८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यातच आता वाढत्या उन्हामुळं राज्यात चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.