मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Megablock : मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Mumbai Local Megablock : मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 14, 2023 05:19 PM IST

Mumbai Local Megablock : मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं आता ऐन वीकेंडच्या दिवशीच मुंबईकरांची तारांबळ होणार आहे.

Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablock (HT)

Mumbai Local Megablock : रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी भारतीय रेल्वेने मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावर येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार आहे. त्यामुळं आता ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरण्यासाठी निघणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ होण्याची शक्यता आहे. रेल्वे रूळ, हेड वायर आणि सिग्नल यंत्रणा यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला असून हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.४७ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेतल्यानंतर माटुंगा आणि मुलुंड दरम्यानची लोकलसेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. पनवेल ते कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकलसेवा चालवल्या जाणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसेल. मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळं सीएसटीहून डाऊन जलद मार्गावरील लोकल रेल्वेगाड्या डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सीएसटीहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे-अप-डाऊन आणि सीएसएमटी-वडाळा रोड ते वाशी-बेलापूर-पनवेल अप आणि डाऊन या लोकलसेवा बंद राहणार आहे. याशिवाय सीएसटी ते वांद्रे-गोरेगाव अप आणि डाऊन या लोकलसेवा बंद राहतील. मेगाब्लॉकमुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे.

IPL_Entry_Point