Bus Falls Into Ravine In Karoli Ghat: इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणारी खाजगी बस १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. ही घटना जळगाव जामोद- बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस २८- ३० प्रवाशांना घेऊन इंदूरहून अकोल्याकडे जात होती. मात्र, जळगाव जामोद- बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटातून येत असताना बस १०० फुट दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात २८ जण जखमी झाले. जखमींना मध्यप्रदेशच्या दर्यापूर आणि बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ईस्टर्न फ्रीवेवर ट्रक उलटल्याची घटना घडली. ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. वाहन चालकाने वेळीच ट्रकमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच वडाळा वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे ईस्टर्न फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ईस्टर्न फ्रीवेवर ट्रक आणि दुचाकीला परवानगी नसतानाही ते मुक्तपणे फिरत असल्याचे आरोप केला जात आहे.
सांगली जिल्ह्यातील जांभुळवाडी परिसरात गेल्या आठवड्यात क्रुझर कारने खासगी ट्रॅव्हल्स बसला मागून धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाले. ही टक्कर इतकी भीषण होती की क्रूझरचा पुढचा भाग निखळला. कर्नाटकातील बागलकोट येथील जमखंडी येथील लोक सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे लग्नासाठी येत होते. त्याचवेळी जांभुळवाडी गावाजवळ क्रुझरने प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली.