Bus Fire News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वडगावजवळ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने, या आगीच्या घटनेत कोणतीही जिवतहानी झाली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वडगावजवळ एका खाजगी बसला आग लागली. या बसमधून ३६ प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली, याबाबत अध्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ईस्टर्न फ्रीवेवर मंगळवारी सकाळी एका कारला आग लागली. त्यानंतर तासाभराहून अधिक काळ वाहनधारक अडकल्याने वाहतुकीची मोठी रांग लागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे निघालेली व्होल्वो एसयूव्ही कार फ्रीवेच्या शिवडी भागात येताच कारने पेट घेतला. वाहन चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारने पेट घेण्यापूर्वी आपोआप तिचा वेग कमी झाला. काही सेकंदानंतर कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यानंतर तो ताबडतोब कारमधून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. आगीची घटनेनंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. जळालेली कार शिवडी पोलिस स्टेशनला पाठवण्यात आली. नंतर आगीचे कारण शोधण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे पोलिसांनी औपचारिक तक्रार नोंदवली नाही. याप्रकरणी शिवडी पोलिसांत नोंद करण्यात आली.