मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PFI Raid : पुरावे असतील तर चौकशी करा, मीडिया ट्रायल नको- खासदार इम्तियाज जलील

PFI Raid : पुरावे असतील तर चौकशी करा, मीडिया ट्रायल नको- खासदार इम्तियाज जलील

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 27, 2022 02:54 PM IST

PFI Raids In Aurangabad : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध शहरांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआय या संघटनेच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. त्यावर आता एमआयएमनं प्रतिक्रिया दिली आहे.

MP Imtiyaz Jaleel On PFI Raids In Aurangabad
MP Imtiyaz Jaleel On PFI Raids In Aurangabad (HT)

MP Imtiyaz Jaleel On PFI Raids In Aurangabad : काही दिवसांपूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मालेगांव, पुणे, भिवंडी आणि औरंगाबाद शहरातही धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता आज सकाळीही केंद्रीय तपास यंत्रणांनी देशातील अनेक शहरांमध्ये धाडी टाकल्या असून सकाळी औरंगाबाद शहरातही पीएफआयच्या कार्यालयांवर पुन्हा छापेमारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादेतील कारवाईबाबत बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आम्हाला या कारवाईबाबत फार काही जास्त बोलायचं नाही. तपास यंत्रणांकडे पुरावे असतील तर त्यांनी कारवाई करावी, परंतु काहीही नसताना केवळ लोकांना त्रास देण्याच्या उद्देशानं ही कारवाई केली जात असेल तर हे चुकीचं आहे. याशिवाय या प्रकरणात मीडिया ट्रायल चालवणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया खासदार जलील यांनी दिली आहे.

याआधीही अनेकदा केवळ संशयाच्या बळावर अनेक तरुणांना अटक करण्यात आली होती. परंतु काही वर्षांनंतर ते निर्दोष सुटले. आता त्याचं उत्तर कोण देणार आहे?, अटक झालेल्या तरुणांचे नातेवाईक माझ्याकडे येत आहेत. मी त्यांना समजून सांगतोय की, तुमची मुलं निर्दोष असतील तर काळजी करू नका. परंतु पुरावे असतील तर त्याचं कुणीही समर्थन करणार नाही, असंही खासदार जलील म्हणाले.

दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरही आता खासदार जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

IPL_Entry_Point